मोठ्या प्रमाणात जागा निघालेली एक परीक्षा.....आणि सगळीकडे फक्त त्याचीच चर्चा...✍️
खूप दिवसापासून खोळंबलेली तलाठी परीक्षेची जाहिरात येताच स्पर्धा परिक्षा देणाऱ्या,आणि सरकारी नोकरीसाठी धडपडणाऱ्या युवक युवतींमधे एकच गडबड सूरू झाली आहे जो तो तलाठी जाहिरातीबद्दल बोलू लागलाय
संपूर्ण महाराष्ट्रभर 4000 पेक्षा जास्त जागा असल्याने सगळ्यांनाच त्याची उत्सुकता लागली आहे.या जिल्ह्यात येवढ्या जागा त्या जिल्ह्यात तेवढ्या जागा कुठे किती अर्ज येणार असे अंदाज आणि बरच काही.
कुठल्या जिल्ह्यातून फॉर्म भरायचा याची चाचपणी अनेकजण करू लागलेत नियमित अभ्यास करणाऱ्यांनी अभ्यासाला जोर लावलाय.त्यांनी सगळा फोकस तलाठी परीक्षेवर लावुन जोरदार तयारी सुरू केली आहे.
![]() |
| @अभ्यास...✍️ |
अभ्यास सोडुन लग्न करून स्थिरस्थावर झालेल्या मित्रांचे फोन अभ्यासात असलेल्या मित्रांना यायला लागले आहेत त्यात ते अभ्यासाविषयी आणि पुस्तकांविषयी चौकशी करू लागले आहेत.अनेकवेळा अपयश आल्याने स्पर्धा परिक्षेला रामराम करून कामाला लागलेल्या अनेकांनी जुन्या पुस्तकांवरची धूळ झटकून पुन्हा नव्याने त्यातली पुस्तके उघडायला सुरुवात केली आहे.हवसे,गवसे,नवसे सगळेच आता जोमात तयारी करण्यासाठी मैदानात उतरले आहेत.
पुस्तके खरेदी करण्यासाठी स्पर्धा परीक्षांची पुस्तके विक्रीच्या दुकानात एकच झुंबड उडू लागली आहे.
स्पर्धा परीक्षा पुस्तकांशी संबधीत सगळे लेखक आणि प्रकाशक याची सुगी सुरू झालीये अस दिसतय.त्यातTCS आणि IBPS या कंपन्या पारिक्षा घेणार म्हणाल्यावर त्याच आशयाचे मजकूर मुखपृष्ठावर छापून आहे तेच अभ्यास साहित्य किंवा जूने साहित्य परीक्षार्थींच्या गळ्यात मारुन पैसे कमवण्याचे प्रयत्न त्यांच्याकडून सूरू असलेलं दिसतंय.अर्थात याला काही चांगले अपवाद सुद्धा आहेत.
![]() |
| @स्पर्धा परीक्षा पुस्तके.... |
TCS आणि IBPS या कंपन्या कशी परिक्षा घेणार याविषयी सर्वत्र संभ्रम असल्यामुळे आणि अभ्यासाचा नेमका आवाका समजत नसल्यामुळे कोणी काही सांगेल ते योग्यच आहे असा सगळ्यांचा समज होत आहे.सरळसेवा भरती असल्याने मराठी व्याकरण,इंग्रजी व्याकरण गणित-बुद्धिमत्ता आणि सामान्यज्ञान या विषयाच्या पुस्तकांना जोरात मागणी आहे.मार्गदर्शन करणाऱ्या अनेक उसण्या मार्गदर्शकांचे पेव फुटले आहे.काही चांगले अपवाद वगळता जो तो आम्हीं कसे स्वस्तात शिकवतो आणि भारी शिकवतो हे सांगण्यात दंग आहे.अगोदरच्या परीक्षांमध्ये यशस्वी झालेल्यांच्या मागे लागून त्यांचे फोटो मिळवून आमच्या मुळे ते कसे अधिकारी झाले असे फुलवून फुलवून सांगत आहेत. आणि त्यांच्या फोटोची मोठी मोठी होर्डिंग्ज चौका चौकात लावुन आमच्यामुळे इतके आधिकरी घडले वगैरे वगैरे सांगुन नवीन विद्यार्थांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत.
सगळ्या अभ्यासिका आता अभ्यास करणाऱ्या युवक युवतींनी फुल्ल भरल्या आहेत.त्यातल्या त्यात शांत असणाऱ्या अभ्यासिकांना जास्त मागणी आहे.
![]() |
| @अभ्यासिका.. |
लग्न झाल्यामुळे आणि संसारात रममाण व्हावे लागल्यामुळे(काही जणींची इच्छा नसताना सुद्धा)अनेक मुलींचा अभ्यास सुटला होता.सासरी गेलेल्या कितीतरी जणींना ही परीक्षा आपली अपुरी स्वप्नं पुर्ण करण्याची संधी वाटते आहे.अंगावर पडलेल्या घराच्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळत मिळेल त्या वेळात अभ्यासाची तयारी करताना त्या दिसत आहेत.काही जणींची कसरत वेगळीच,नवऱ्याची परवानगी मिळवायची,सासू-सासऱ्यांची परवानगी मिळवायची घराचा सगळा पसारा आवरायचा.सगळ्यांना हवं नको ते बघायचं आणि मग अभ्यासाला वेळ द्यायचा.
घरातून लग्नासाठी दबाव असताना तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत अभ्यास करणाऱ्या कित्येक पोरी.अशा अनेक गोष्टी असुनही खचून न जाता स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी धडपडताना अनेकजणी दिसत आहेत.
फॉर्म कसा भरावा याची व्यवस्थित माहिती नसलेले ज्यांना माहिती आहे अश्यांच्या मागे लागताना दिसत आहेत.प्रत्यक्ष फॉर्म भरतानाच्या वेगळ्याच अडचणी,कुणाचं नाव चुकीचं पडतय तर कुणाचा फोटो चुकीचा जातोय,
सिलेक्ट केलेल document एक आणि अपलोड होणारे document दुसरच असा सगळा घोळ.फॉर्म भरण्याची मुदत कंपनीकडून दोन वेळा वाढण्यात आली.
तब्बल साडेतेरा लाख उमेदवारांनी अर्जांची नोंदणी केली आहे.
परीक्षा फी ₹1000 रुपये म्हणजे जरा जास्तच यातून तब्बल₹100 कोटी पेक्षा जास्त महसूल जमा झाल्याचं दिसतंय.
फॉर्म भरण्यासाठी फी ची जमवाजमव करणे म्हणजे उमेदवारांसाठी दिव्यच आहे
मग यात मनात नसताना कुणाकडून तरी पैसे मागावे लागणे,उसनवारी करणे अशा अनेक गोष्टी दिसत आहेत.
सोशल मीडिया या सगळ्यात मागे नाही.
YouTube shorts, instagram reels,
Facebook memes सगळेच आघाडीवर आहेत.
रोज अचाट कल्पनाशक्तीचा वापर करून बनवलेल्या reels आणि memes चा धुमाकूळ चालू आहे.
![]() |
| @Memes चा पाउस... |
बघावं तिकड सगळ तलाठी भरती,तलाठी भरती आणि तलाठी भरती.अनेकांची स्वप्न या परीक्षेशी जोडली गेली आहेत.कुणाचं घर,कुणाचं लग्न,कुणीची स्वतःला सिद्ध करण्यासाठी धडपड,कुणाची नाव करण्यासाठी धडपड तर कुणाची नुसतीच हवा करण्यासाठी धडपड.

@उघड होणारे भरती घोटाळे. सौ. दै.सकाळ
मोठ्या प्रमाणत जागा निघालेली एक परिक्षा कित्येक गोष्टीशी निगडीत आहे हे यानिमित्ताने लक्षात येतंय
लवकरच परीक्षा होईल नोकरी मिळवण्याचे साडेतेरा लाखांपैकी चार हजार पेक्षा जास्त जनांचे स्वप्न पूर्ण होईल यानंतर बाकीच्यांचे काय होईल.?
असा प्रश्न पडतो तेव्हा अनेक अडचणी,परीक्षेतील गैरप्रकार, समोर येणारे नोकरभरती घोटाळे,आर्थिक खालावलेली परिस्थिती दुरावलेले नातेसंबंध,भावनिक आणि मानसिक खच्चीकरण अशा नियती घेत असलेल्या परीक्षेत मात्र हार मानायची नाही असा ठाम निश्चय करून लढणारे जिगरबाज युवक युवती दिसतात आणि मनात प्रचंड आशावाद निर्माण होतो तेंव्हा बाकीच्यांच काय होईल या प्रश्नाचं उत्तर आपोआप मिळतं.....
©लेखन:-श्रीकांत मेडशिंगे...✍🏼




वास्तविकता.... योग्य शब्दात वर्णन केलंय.. ❤
उत्तर द्याहटवावास्तव आहे..लेखणी पण खूप भारी आहे..वास्तवातील खर आस्तित्व काय आहे याची प्रचिती या लेखणीतून पुरेपूर येते.खूप भारी विश्लेषण..
उत्तर द्याहटवाखूप छान लेखन.....असेच लिहीत रहा..👌👌✍️✍️
उत्तर द्याहटवा